प्रत्येक गावाने सौर ऊर्जा निर्मितीकडे पुढाकार घ्यावा - आ. महेश शिंदे, चंचळी येथे ८ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

by Team Satara Today | published on : 26 May 2026


कोरेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार शेतकरी हितासाठी अहोरात्र कार्यरत असून, सौरऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा सरकारचा मनोदय आहे. देशात प्रथमच महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक गावाने सौर ऊर्जा निर्मितीकडे पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथे मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या आठ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, सारिकाताई फाळके, रत्नदीप फाळके, कोरेगाव तालुका पानंद रस्ते समितीचे सदस्य राजेंद्र घोरपडे, ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, भाजपच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव कांबळे, विकास सोसायटीचे चेअरमन ॲड. सतीश कदम, माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, विशाल वाघ, शिवाजीराव जाधव, राम कदम, सुनील वाघ, रमेश माने, प्रदीप आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

शेंदुरजणेत लवकरच नव्याने प्रकल्प उभारला जाणार 

आमदार शिंदे पुढे म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर आधारित सुमारे २०० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. आता सौरऊर्जेद्वारे देखील सातारा जिल्ह्यात २०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे नियोजन आहे. शेंदुरजणे येथील शेतकऱ्यांनीही सौर ऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दिला असून, तेथेही लवकरच नव्याने प्रकल्प उभारला जाणार आहे.

कोरेगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार 

कोरेगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला जाणार असून, जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेद्वारे भाडळे खोऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पाण्याचा ९८ टक्के सिंचनासाठी प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक वीज आता सौरऊर्जेद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंचळी ग्रामस्थांनी प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आमदार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. प्रारंभी आमदार शिंदे यांचे प्रकल्पस्थळी स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. वेळेत आणि उत्कृष्ट दर्जाचा प्रकल्प उभारल्याबद्दल आमदार शिंदे यांनी कंपनीच्या प्रकल्प अभियंत्यांचे कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाणीसह विनयभंगप्रकरणी तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
डोंगरावरील दगडांमुळे अनावळे गाव धोक्याच्या छायेत; प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी

संबंधित बातम्या