विडणी आणि बरड परिसर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज; पालखीतळावर भाविकांसाठी सर्व सुविधा

by Team Satara Today | published on : 18 July 2026


फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण तालुक्यात दाखल झाला असून विडणी आणि बरड परिसर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पालखी मार्गालगतच्या गावांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी आणि ग्रामस्थ माऊलींच्या दर्शनासाठी आतुर आहेत.

'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात शुक्रवारी पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये आगमन झाले. एक दिवसाच्या मुक्कामानंतर आज सकाळी ६ वाजता पालखी बरडकडे प्रस्थान करणार असून सकाळी ९ वाजता विडणी येथे विसाव्यासाठी थांबणार आहे. विडणी येथील पालखीतळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अन्नदान, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह (शॉवर), स्वच्छतागृहे, मोबाईल चार्जिंग पॉइंट तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीनेही वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय विडणी ग्रामस्थ, विविध तरुण मंडळे, सामाजिक संघटना आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने माऊलींच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पालखीतळावर ह.भ.प. शंकर महाराज लोंढे (नांदेड) यांचे कीर्तन झाले.

विडणीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा सकाळी ११ वाजता पिंप्रद येथे न्याहारीसाठी थांबणार असून तेथे दुपारी १२ वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम पार पडतील. त्यानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होत सायंकाळी ६ वाजता बरड येथे मुक्कामी दाखल होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणस्थळावरून रुग्णालयात हलवले; जंतर-मंतरवर तणाव
पुढील बातमी
लाखो वैष्णवांचा मेळा फलटणमध्ये विसावला माऊलींचा सोहळा; हरिनामाच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले

संबंधित बातम्या