पाटण : पाटण - सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाट मार्गावर चालकाचा ताबा सुटून गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यात चालक साहिल अनिल जाधव (वय 20, रा. गोळेश्वर, ता. कराड) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अपघाताची नोंद पाटण पोलिस ठाण्यात झाली आहे.
पाटण पोलिसांसह घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सडावाघापूर परिसरात पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाट मार्गावर पर्यटकांसाठी टेबल पॉईंट आहे. येथे दोन्ही बाजूला खोल दरी आहे. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास साहिल जाधव हा आपल्या मित्रांसमवेत चारचाकीतून पर्यटनासाठी आला होता. टेबल पॉईंट येथे चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यात व्यस्त होते. त्यानंतर साहिलने गाडी चालू केली. मात्र, गवतावरून गाडी घसरल्याने त्यांचा ताबा सुटला आणि गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हे सहकार्यांसह अपघातस्थळी आल्यावर साहीलला वर काढले.
दरीत गाडीसोबत अडकलेल्या साहिलला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी सुरूल येथील किंगमेकर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मदत घेतली. तर या परिसरात बकरी चरावयास आलेल्या मंगेश जाधव या म्हावशी येथील युवकाने मोठ्या धाडसाने गाडीचा दरवाजा तोडला. त्यामुळे सुमारे तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर साहिलला झोळीत घालून दरीतून रस्त्यावर आणण्यात यश आले.