वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी 29.77 कोटी मंजूर : ना. मकरंद पाटील, ग्रामीण, पर्यटन क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार

by Team Satara Today | published on : 08 March 2026


वाई : वाई विधानसभा मतदारसंघातील वाहतुकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा. यासाठी वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 29 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. ग्रामीण जनतेच्या मागण्या तसेच पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. महाबळेश्वर येथील प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणेमुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा थेट लाभ स्थानिक व्यावसायिकांना मिळणार आहे. या कामांमुळे मतदारसंघातील दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

बजेटमध्ये वाई तालुक्यातील ओझर्डे ते जोशीविहीर रस्ता 4 कोटी, खानापूर ते वाईसुरूर रस्ता जोडणी 3 कोटी, बावधनकणूरदरेवाडी रस्ता 6 कोटी, चिखली येथील दोन पूल व धावली येथील पूल बांधकाम 4 कोटी 77 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.


खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर गावातील मुख्य रस्त्यांसाठी 4 कोटी, कर्नवडी पुलाजवळ संरक्षक भिंतीसाठी 1 कोटी 20 लाख तर महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थर सीट पॉईंट रस्त्यासाठी 5 कोटी, केटस पॉईंट रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांना गती मिळून ग्रामीण तसेच पर्यटन क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; शहर पोलिस तक्रार, वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा ​​​​​​​
पुढील बातमी
मुनावळे ते वासोटा असा रोपवे तयार करण्यासाठी आर्थिक तरतूद; रोपवेमुळे पर्यटकांना काही मिनिटांत वासोटा किल्ल्यावर पोहोचता येणार

संबंधित बातम्या