सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्यासह अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
प्रारूप मतदार यादी दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप सादर करण्यासाठी दि. १८ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या आक्षेपांवर निर्णय घेण्याची अंतिम तारीख दि. ७ सप्टेंबर असून त्यानंतर दि. ११ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांच्या कार्यालयात तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात आणि बँकेच्या सर्व शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा कार्यक्रम विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी जाहीर केला आहे.