सातारा : पळसावडे, ता. माण येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी या कंपनीने भूमिपुत्रांवर अन्याय केला आहे. येथील कामगारांना कंपनीने करार नियमांचे पालन न करता सर्व आश्वासने कागदावर ठेवले आहेत. तसेच गावाला वीज पुरवठा ग्रामविकास इत्यादी आश्वासनांनाही हरताळ फासला आहे. या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर घोंगडी आंदोलन सुरू केले आहे.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख झुबीन वकील, प्रोजेक्ट मॅनेजर निलेश महाले, याशिवाय साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद आहे की, टाटा पावर कंपनीने भूमिपुत्र कामगारांना दिलेले लेखी आश्वासने तसेच गावाच्या विकासाबाबत चर्चा केलेल्या योजना याची तात्काळ अंमलबजावणी करावी, स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात, कंपनीने सीएसआर फंडाचा पारदर्शक वापर करावा, कामगारांवरील अन्याय थांबवून सामाजिक सुरक्षा हक्क सुनिश्चित करावे व कंपनी व प्रशासनाने संयुक्त समिती स्थापन करून ठोस निर्णय घ्यावा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
या मागण्या मान्य होईपर्यंत सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घोंगडी आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत वेळीच निर्णय न झाल्यास यापुढे भंडारा भेट आंदोलन केले जाईल कर्चे आणि त्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांनी 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काळी दिवाळी आंदोलन साजरे केले होते. कंपनी प्रशासनाला काळा दिवाळी फराळ भेट देण्यात आला. जोपर्यंत रिन्यूएबल एनर्जीच्या वतीने कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचा इशारा करचे यांनी दिला आहे.