प्रेमसंबंधातूनच लक्ष्मण मंडलेंचा खून; कार्व्हेतील प्रियकरासह कराडातील कार चालक गजाआड

by Team Satara Today | published on : 09 June 2026


कराड : प्रेमसंबंधात अडसर ठरणार्‍या लक्ष्मण मंडले यांचा कायमचा काटा काढणाऱ्या प्रियकरासह दोन्ही संशयितांना अटक करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. संशयितांनी खून करण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून, दोन्ही आरोपींना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

​या प्रकरणी पोलिसांनी प्रथमेश प्रकाश थोरात (वय २५, रा. कार्व्हे, ता. कराड) आणि आकाश अशोक होनसुरे (वय २३, रा. कल्पतरू कॉलनी, थोरात हॉस्पिटलजवळ, कराड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यापूर्वी याच प्रकरणात पोलिसांनी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक केली आहे.

​पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आकाश होनसुरे याने पैशाच्या आमिषाला बळी पडून मित्र प्रथमेश थोरात याच्या सांगण्यावरून लक्ष्मण मंडले यांच्या अंगावर गाडी घातल्याचे कबूल केले आहे. संशयित प्रथमेश थोरात याचे कापड दुकान असून, त्या माध्यमातून त्याची ओळख सारिका मंडले हिच्याशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. मागील तीन वर्षांपासून प्रथमेश आणि सारिका यांचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान मृत लक्ष्मण मंडले हे सारिका हिला त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून आणि प्रेमसंबंधातील अडसर दूर करण्यासाठी सारिका मंडले हिने प्रियकर प्रथमेश थोरात याच्या मदतीने पती लक्ष्मण मंडले यांचा काटा काढण्याचा कट रचला.

​हा कट पूर्ण करण्यासाठी प्रथमेश आणि आकाश या दोन्ही मित्रांनी मिळून एक कार खरेदी केली होती. मागील काही दिवसांपासून हे संशयित लक्ष्मण मंडले यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. शनिवारी त्यांना संधी मिळताच त्यांनी कारने धडक देऊन लक्ष्मण मंडले यांचा खून केला. कराड शहर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व संशयितांना जेरबंद केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळा सोडल्याच्या दाखल्यांसाठी शुल्क घेतल्यास कारवाईचे शिक्षण विभागाचे आदेश; दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासा
पुढील बातमी
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ‘क्रेटा’च्या धडकेत पुणे येथील पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या