राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

हवामान विभागाकडून अलर्ट जारी

by Team Satara Today | published on : 02 April 2025


मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने बुधवारी, गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शाळू काढणीला आला असून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरूवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. नंतर तो ‘येलो अलर्ट’ असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 4 आणि 5 तारखेला पूर्वेकडे स्थलांतरीत होऊन विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील 4 दिवस काही ठिकाणी वीज, ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. यावेळी अनेक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज आहे.

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे. तर पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, अमरावती आणि बीड या 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही जाणवत आहे. वातावरणातील बदलाचा फरक सध्या जाणवत आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रात हवेत चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे वातावरणातील खालचा जो भाग आहे, तिकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे असतात. वरच्या थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे असतात. अशी परिस्थिती ढगाळ वातावरणासाठी तथा विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्यासाठी पूरक असते. अशी परिस्थिती मागच्या दोन दिवसांपासून दिसत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार केला तर या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण
पुढील बातमी
अनुष्‍का उद्योगाच्‍या नावाखाली लाखोंची फसवणूक

संबंधित बातम्या