गणराया स्वागत मिरवणुका शक्यतो शनिवारी काढाव्यात

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन; डॉल्बी संदर्भात ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करणार

by Team Satara Today | published on : 29 July 2025


सातारा : येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. श्रीं च्या आगमन सोहळ्याच्या भव्य मिरवणुका सातार्‍यातून गेल्या काही वर्षापासून निघत आहेत. या मिरवणुका सातारकरांना त्रास न होता आटोपशीर पद्धतीने काढल्या जाव्यात आणि त्या शक्यतो एक व दोन ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवार रविवारी काढाव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.

येथील आरसीपी हॉलमध्ये एका गुन्हे तपासाची माहिती देण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देताना दोशी बोलत होते. गणरायाचे आगमन, त्याची तयारी, डॉल्बी आवाज, ध्वनी प्रदूषण तसेच गणेश भक्तांच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने असणार्‍या अडचणी या विविध प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दोशी पुढे म्हणाले, सातार्‍यात श्री गणरायांचे आगमन हा आनंदाचा क्षण असतो. तो उत्साहात साजरा करण्याचा गणेश भक्तांचा कल असतो. सातार्‍यात श्री आगमनाचे भव्य दिव्य सोहळे काढले जातात. मात्र ते सोहळे काढताना वाहतूक कोंडी होऊ नये आणि त्याचा सातारकरांना त्रास होऊ नये याचे भान गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठेवावे. तसेच या स्वागत मिरवणुका शक्यतो शनिवारी- रविवारी म्हणजेच एक व दोन ऑगस्ट रोजी ठेवाव्यात. जेणेकरून सुट्टीचे दिवस असल्याने रस्त्यावर गर्दी कमी असते आणि त्याचा सातारकरांना त्रास होत नाही. या संदर्भाने मिरवणुका व्हाव्यात आणि त्याचाही आनंद सातारकरांना लुटता यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भाने तो निर्विघ्नपणे पार पाडला जावा या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांची बुधवार दिनांक 30 रोजी शाहू कला मंदिर येथे बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील. तसेच आवश्यक नियमांचा क्शन प्लॅनही त्यांना निर्देशित केला जाईल, असे ते म्हणाले.

गणेशोत्सवामध्ये वाजणारी डॉल्बी हा सातारकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करतो. त्यामुळे यावेळी गणेशोत्सवात डॉल्बी वाजणार का, या प्रश्नावर बोलताना तुषार दोषी म्हणाले, डॉल्बी आणि तत्सम वाद्य यंत्राच्या संदर्भाने म्हणजेच ध्वनी प्रदूषण कायद्याच्या दृष्टीने सर्वोच्च व उच्च न्यायालय यांचे नियम अगदी स्पष्ट आहेत. त्या कायदेशीर निर्देशाप्रमाणेच योग्य ती कारवाई केली जाईल. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न पद्धतीने पार पडेल व पोलीस गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि सातारकर यांच्या समन्वयाने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एका चाहतीनं मृत्यूनंतर तब्बल 72 कोटींची प्रॉपर्टी संजय दत्तच्या केली नावे
पुढील बातमी
सातारमधील 21 हजार जणांनी पुसला असाक्षरतेचा कलंक

संबंधित बातम्या