सातारा : साताऱ्यात सोमवारी संविधान की सन्मान में हर भारतीय मैदान मे अशा घोषणा देत संविधान संघर्ष मोर्चा भव्य प्रमाणात काढण्यात आला .या मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गटासह अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाअभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत मोर्चातील आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बूट फेक प्रकरणाचा निषेध केला. वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इडियाचे आठवले, गवई, आंबेडकर, कवाडे) गटांसह बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, मुस्लिम मावळा छत्रपतीचा, जनता क्रांती दल, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भीमशक्ती संघटना, समता पर्व कराड, ओबीसी संघटना, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन, लेक लाडकी अभियान, रिपब्लिकन सेना, देश प्रेमी सामाजिक संघटना दलित महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रज्ञासूर्य सामाजिक संस्था, ऑल इंडिया पॅंथर सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी समाज संघटना, डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना, महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समिती, फकिरा ब्रिगेड या संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
अशा प्रकारचे कोणतेही हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत
दुपारी दोन वाजता मोर्चाला साताऱ्यातून सुरुवात झाली अनेक आंदोलकांनी निळे झेंडे घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या अनेक प्रतिनिधींनी अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय संविधानात वारंवार होणारे हस्तक्षेप तसेच सन्माननीय न्यायपालिकेच्या सन्माननीय व्यक्तींना मिळणाऱ्या अपमानाच्या वागणूक याविषयी जोरदार टीका करण्यात आली. सर्व संघटनेच्या वतीने समन्वयक शिष्टमंडळांच्या सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनाच्या माध्यमातून संविधान रक्षणासाठी सर्व संघटना कटिबद्ध असून अशा प्रकारचे कोणतेही हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा देण्यात आला आहे