सातारा : ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व हॉटेल व धाब्यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तसेच संबंधित यंत्रणांकडून त्वरित तपासणी करण्यात यावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठक अपर जिल्हाधिकारी श्री. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल आणि धाब्यांवर ग्राहकांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा आणि तेथील स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड करु नका, असे निर्देश देऊन अपर जिल्हाधिकारी श्री. इनामदार म्हणाले, प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिक्षा संघटना आणि ग्राहक संघटना यांची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी. मिटरनुसार भाडे न घेणाऱ्या किंवा मिटर नसलेल्या रिक्षांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात त्यांनी दिले.
मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी आणि त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एक विशेष तक्रार निवारण क्रमांक जाहीर करावा. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी गांभीर्याने काम करावे. यासाठी मोहिम स्वरुपात रिक्षांची तपासणी करावी. जे खासगी रुग्णालये जन आरोग्य योजनेंतर्गत आहे अशा रुग्णालयांनी तसे फलक लावावे त्याचबरोबर अशा रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने वेळोवेळी तालुका स्तरावर ग्राहक परिषदेची बैठक घेण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.