सातारा : झेडपीच्या शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ही समुपदेशनाने झाल्या होत्या. पण आता या बदल्यांचे सुधारीत धोरण शासन निर्णयाने निश्चित केले आहे. त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असून या बदल्यांमध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नसणार आहे. बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या आता शैक्षणिक वर्ष ३१ मे पूर्वी होणार आहेत. या प्रक्रियेमुळे आतापर्यंतच्या वशिलेबाजीला लगाम लागणार आहे.
नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवर ऑक्टोबर महिन्यात सुनावणी पार पडली. त्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने शिक्षक बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी कार्यान्वीत असावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार यापुढील काळात दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होवून शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करायची आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेला अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतर दर वर्षीच्या वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असणार आहे. संबंधित वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थीतरित्या सुरु ठेवण्याची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा. लि. पुणे या कंपनीकडे राहणार असल्याचे राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.
एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तशा प्रकारे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या वर्षासाठी संबंधित वेळापत्रक लागू राहणार नाही, तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरुन शासनाची दिशाभूल केल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यावाही देखील होणार असल्याचे राज्य शासनाने शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक
शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द : १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी.
रिक्त पदे निश्चिती : १ ते ३१ मार्च.
समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चिती : २१ ते २७ एप्रिल.
शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे व त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे : दि. ४ ते २७ मे.
सर्वांना पसंतीक्रम भरणे व बदल्या : दि. २८ एप्रिल ते ३१ मे.