कराड : कराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणावर नोंदले गेले आहेत.
कराड परिसराला मुबलक जैवविविधता लाभली आहे आणि याच जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण करून डॉ. सुधीर कुंभार यांच्यासह त्यांच्या टीमने नोंदी केल्या आहेत. कराडजवळ कृष्णा नदीवरील खोडशी धरण परिसर, प्रीतिसंगम बाग, विद्यानगर, कृष्णा पूल, वाखाण परिसर, टेंभू प्रकल्प येथे हे निरीक्षण व नोंदी केल्या आहेत.
निरीक्षणाबाबत डॉ. सुधीर कुंभार यांनी सांगितले की, कराड परिसरात मोर, लांडोर, पाणकावळे, पाकोळ्या, सूर्यपक्षी व सुगरण या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच सुगरणींच्या घरट्यांची संख्याही वाढली आहे. वेडाराघू, लाल मैना, वटवट्या, ट्रायकलर, सुभग, हळद्या, मिनीवेट, तांबट, पिंगळे, गव्हाणी घुबड यांचीही नोंद झाली आहे.
सत्तरहून अधिक घारी..
कराड परिसरात पक्षी निरीक्षकांना सत्तरहून अधिक नागरी घारी दिसल्या आहेत. उंच झाडांवर या घारींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.
निरीक्षकांनी नोंदवलेले पक्षी (कंसात संख्या)
रंगीत करकोचे (२२), पांढऱ्या मानेचे करकोचे (१२), पांढरा अवाक (२०), काळा शराटी (२१), नदी सुरय (२८), स्पून बिल (१८), पिवळा, पांढरा, राखाडी धोबी (५३), शेकाटी (६), चक्रवाक (८), किंगफिशर (११), नीलकंठ (८), हळदीकुंकू बदक (१०३), ब्राह्मणी घार (७), शिक्रा (३), कापशी घार (२), ससाणा (१), जंगल मैना (१२०).
एकाच ठिकाणी दोनशेहून जास्त बगळे
नव्या कृष्णा पुलानजीक एकाच ठिकाणी दोनशेहून जास्त बगळे निरीक्षकांना आढळले. नाइट हेरॉन, जांभळे व राखी बगळे परिसरात आहेत. पांढऱ्या पोटाच्या पाणकोंबड्या, जांभळ्या पाणकोंबड्या, छोटे कार्मोरंट, राखी धनेश, पाणटिटव्याही खोडशी ते वाखाणपर्यंतच्या नदीकाठावर असल्याचे अभ्यासक राजेंद्र कदम यांनी सांगितले.