सातारा : येथील श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज राजेभोसले हायस्कूल आणि माने कॉलनी परिसर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे मुख्य औचित्य साधून अभिरूप पालक सत्कार समारंभ, अभिरूप पालकांकडून दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, ’पहिले पाऊल’ पुस्तिकेचे प्रकाशन, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि आषाढी एकादशीनिमित्त आयोजित सांप्रदायिक वारकरी वेषभूषा स्पर्धेतील सहभागी पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा नगरपालिकेच्या नगरसेविका व भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. हेमलताताई भोसले लाभल्या होत्या. तसेच जलसंपदा सिंचन भवन (धोम कालवे 2, सातारा) येथील सेवानिवृत्त कर्मचारी सौ. स्वप्ना वालेकर आणि जि. प. सातारा येथील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक अशोक भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिरूप पालक योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत शाळेतील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी दत्तक घेतलेल्या अभिरूप पालकांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. दत्तक विद्यार्थ्यांनी आपल्या अभिरूप पालकांना गुरुवंदना करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी अभिरूप पालकांनी विद्यार्थ्यांना गणवेश, नवनीत संच आणि शालेय उपयुक्त साहित्य भेट देऊन प्रत्यक्ष मदत केली.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे व त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचे लिखित स्वरूप कायमस्वरूपी जतन करण्यासाठी ‘पहिले पाऊल’ ही विशेष पुस्तिका तयार करण्यात आली होती. या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सोबतच शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्या इयत्ता चौथीतील नक्षत्र पटेल, स्मित काटे, शिवम दळवी आणि इयत्ता आठवीतील सुशांत राऊळ या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या वर्गशिक्षिका कु. प्रतिभा जाधव व कु. दीपमाला लोहार यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पालकांना सहभागी करून घेत त्यांच्यासाठी सांप्रदायिक वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी पालकांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सौ. रोहिणी जाधव यांनी प्रथम, सौ. वंदना सुतार यांनी द्वितीय, तर सौ. प्रियंका शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उभयावत गटातून रामदास निकम व सौ. भाग्यश्री निकम या दांपत्याला प्रोत्साहनपर विजेते म्हणून संपूर्ण पोशाख, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, शाल व बुके देऊन गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमात सौ. हेमलताताई भोसले यांची भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, संस्थेच्या सर्व शाखांसाठी 6 लाख रुपये किमतीचे इंटरक्टिव्ह पॅनेल मिळवून देणारे अवधूत जगदाळे आणि शाळेतील 115 गरीब विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार्या सौ. स्वप्ना वालेकर यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सौ. हेमलताताई भोसले यांनी संस्थेचे हे उपक्रम अत्यंत नाविन्यपूर्ण व इतरांना प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले. शाळेमध्ये गुणवत्तेसोबतच संस्कार रुजवले जात आहेत ही कौतुकास्पद बाब असून अभिरूप पालक योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक गुलाब माने, छगन पटेल, सौ. वासंती माने, मार्गदर्शिका सौ. स्वाती माने, शाळा व्यवस्थापन समितीचे संभाजी टकले, सौ. प्रमिला यादव, सौ. मोनिका सुतार, संस्थेचे हितचिंतक चंद्रहार माने, सौ. अनिता गुरव यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य, पदाधिकारी, अभिरूप पालक आणि लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैशाली भोसले व कु. प्रतिभा जाधव यांनी केले, प्रास्ताविक सलीम मुलाणी यांनी मांडले तर आभार कु. मायावती निकम यांनी मानले. संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.