सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल : बाळासाहेब पाटील

मोठे शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

by Team Satara Today | published on : 29 October 2024


सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली.

या रॅलीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, सौरभ पाटील, जशराज पाटील, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण करणारा जिल्हा आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही आपण यशवंतराव चव्हाण, आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारांनुसारच राजकीय वाटचाल करत आहोत. मतदारसंघात विरोधकांकडून जातीवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, ही विचारांची लढाई असून येथील सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, दत्त चौकामध्ये आ. बाळासाहेब पाटील आणि भाजपचे नेते मनोज घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांचा समूह समोरासमोर आल्याने या ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. त्यामुळे काहीकाळ तलावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ देणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
पुढील बातमी
भव्य शक्तीप्रदर्शन करत मनोज घोरपडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

संबंधित बातम्या