साताऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खुनाचा कट उधळला, सराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद

by Team Satara Today | published on : 23 April 2026


सातारा :जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका धाडसी कारवाईत सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे एका संभाव्य खुनाचा कट वेळीच उधळण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपींकडून दोन पिस्टल, जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांसह एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तैनात केले होते. दरम्यान, डबेवाडी (ता. सातारा) येथील करण जोतिराम चव्हाण (वय २१) हा तरुण त्याच्या जुन्या वैमनस्यातून काही तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. आरोपी आपल्या साथीदारासह गावातच शस्त्रे घेऊन थांबल्याचे समजताच पोलिसांनी डबेवाडी येथील शूरवीर करिअर अकॅडमी परिसरात तातडीने सापळा रचला.

​पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या पथकाने पाठलाग करून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, पोलिसांना दोन देशी बनावटीची पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, एक सुरा, दोन कुकरी, दोन मोबाईल हँडसेट आणि एक मोटारसायकल असा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईमुळे साताऱ्यात होणारा एक मोठा रक्तपात टळला आहे.

​याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे आणि भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे आणि त्यांच्या पथकाने केली असून, या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस आक्रमक
पुढील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रश्नी समिती आक्रमक; पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध

संबंधित बातम्या