कराड : स्वतंत्र भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरणारे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर 'पद्म' पुरस्कार देण्याबाबत आता केंद्र सरकारला आणि पद्म पुरस्कार समितीला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या शिफारसीवर आणि सर्व कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवारी दिले.
न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालामुळे तब्बल सात दशकांपासून प्रलंबित असलेल्या या ऐतिहासिक सन्मानाच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दिवंगत पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याबाबत राज्य सरकारने पाठवलेल्या शिफारसीवर पद्म पुरस्कार समितीने गांभीर्याने विचार करावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी दिले.
खाशाबांच्या सुपुत्राची उच्च न्यायालयात याचिका दाखल
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील सुपुत्र खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी (फिनलंड) ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावून जागतिक पटलावर भारताचा तिरंगा फडकवला होता. याप्रकरणी ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’चे संस्थापक रणजित खाशाबा जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
पद्म पुरस्कार निवडीसाठी कोणताही कठोर निकष नसून संबंधित व्यक्तीचे जीवनगौरव कार्य पाहिले जाते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत खंडपीठाने केंद्र शासनाचा दि. ३० एप्रिल २०२६ चा पत्रव्यवहार नियमांशी विसंगत ठरवून अमान्य केला आणि याचिका निकाली काढली.
वडील ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळण्याबाबत २००१ पासून मी भारत सरकारकडे मागणी करत आलो आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी देत असलेल्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.
- रणजित खाशाबा जाधव, (खाशाबा जाधव यांचा मुलगा, गोळेश्वर, ता. कराड)
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा सन्मान होणार! कोल्हापूर सर्किट बेंचचे पद्म पुरस्कार समितीला निर्देश, ऐतिहासिक सन्मानाच्या लढ्याला मोठे यश
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा