समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई

नव्याने होणाऱ्या अतिक्रमणांवर करडी नजर

by Team Satara Today | published on : 18 April 2026


सातारा: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या अतिक्रमणांवर अखेर सातारा नगरपालिकेने निर्णायक पाऊल उचलले आहे. प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी समर्थ मंदिर चौक ते बोगदा रस्ता या दरम्यान धडक मोहीम राबवून रस्ता मोकळा करण्यात आला. या परिसरात अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभारलेल्या टपऱ्या आणि हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

​नगरपालिका प्रशासनाने यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना अनेक वेळा सूचना देऊनही अतिक्रमणे हटवली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत चार टपऱ्यांवर हातोडा टाकला, तर दोन हातगाड्या जप्त केल्या. याशिवाय परिसरातील इतर विनापरवाना हातगाड्यांवरही कडक नियंत्रणात्मक कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे समर्थ मंदिर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून, वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

​शहरातील इतर भागांतही अतिक्रमणांविरोधात अशीच मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, यापुढे अतिक्रमणांवर करडी नजर ठेवली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका

संबंधित बातम्या