रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने पोवई नाका-बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर अवजड वाहनांना बंदी; 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अंतर्गत अधिकारांचा वापर करून 10 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ही वाहतूक व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या या मार्गावरील रस्त्याच्या एका बाजूचे कॉंक्रिटीकरण सुरू असून दुभाजकाच्या पलीकडील केवळ एकच मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे एसटी बसेस, ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टर आणि इतर अवजड वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील वर्दळीमुळे वाहतूक कोंडी होत असून कामात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच वाहनचालकांमध्ये वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन आदेशानुसार पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या दोन्ही दिशांनी सर्व एसटी बसेस आणि ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रॅक्टरसह सर्व प्रकारच्या अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून मुंबई, पुणे, कोरेगाव व सोलापूरकडे जाणार्‍या एसटी बसेस व अवजड वाहने जुनी जिल्हा मध्यवर्ती बँक-पोलीस परेड मैदान-पारंगे चौक-जुना आरटीओ चौक-वाढे फाटा या मार्गाने शहराबाहेर जातील. तर मुंबई, पुणे, कोरेगाव व सोलापूरकडून सातारा शहरात येणारी एसटी बसेस आणि अवजड वाहने वाढे फाटा-जुना आरटीओ चौक-पारंगे चौक मार्गे सातारा बसस्थानकात प्रवेश करतील.

दरम्यान, पोवई नाका-बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने, शाळेच्या बसेस, कार, ऑटो रिक्षा, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाच प्रवेश देण्यात आला आहे.

रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी सर्व वाहनचालकांनी नवीन वाहतूक व्यवस्थेचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; विकासकामे, शाळा, इमारती व समाजकल्याणासह 18 विषयांवर होणार चर्चा
पुढील बातमी
मोळाचा ओढा येथे जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कम व दुचाकीसह मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या