भरतगाव व भरतगाववाडी यांना जोडणाऱ्या पुलाची रुंदी व उंची वाढणार ; दोन्ही राजेंची मागणी अन्‌‍ ना. गडकरींची तात्काळ मंजुरी

by Team Satara Today | published on : 16 May 2026


सातारा : खा.उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील भरतगाव व भरतगाववाडी (ता. सातारा) यांना जोडणाऱ्या पूल क्र. 722+266 ची उंची वाढवण्याची आग्रही मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भुईंज येथील कार्यक्रमात शुक्रवारी केली.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून ना. गडकरी यांनी या कामाच्या मंजुरीचे तत्काळ आश्वासन देत राजेंनी दिलेल्या पत्रावर आपला रिमार्क दिला. त्यामुळे राजेंच्या आग्रही मागणीला ना. गडकरींची तात्काळ मंजुरी मिळाल्याने भरतगाव आणि परिसरातील हजारो नागरिकांना, ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

महामार्गावरील भरतगावातील पुलाची उंची खूपच कमी असल्याने अपघात होतात. पावसाळ्यात साचणारे 2 ते 3 फूट पाणी आणि 8 ते 10 गावांतील नागरिक, महिला व शाळकरी मुलांचे होणारे हाल या समस्येचे गांभीर्य नेत्यांनी ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

राजेंची आग्रही मागणी पाहता, ना. नितीन गडकरी यांनी तत्काळ या कामाला मंजुरी दिली. पुलाच्या रुंदीकरणाबाबत आणि उंची वाढवण्याबाबतचे निवेदन किसनवीर कारखाना कार्यस्थळावर ना. गडकरी यांना सुपूर्द करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण मागणीवेळी ना. मकरंद पाटील, सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, सूर्यकांत पडवळ, भरतगावच्या सरपंच सौ. संगीता कदम, भरतगाववाडीच्या सरपंच सौ. उर्मिला पडवळ, भरतगावच्या उपसरपंच सौ. निलम शेडगे, विश्वास देशमुख, अमोल शेडगे, चंद्रकांत काटकर, प्रकाश कणसे, तेजस जगताप, सचिन पवार आणि भरतगाव व भरतगाववाडी परिसरातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला; 21 जूनला मतदान, 23 जूनला मतमोजणी
पुढील बातमी
सोहम शेंडे यांची आयएफएस अधिकारीपदी निवड; भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील युवकाची प्रेरणादायी यशोगाथा

संबंधित बातम्या