कराड : कराड पालिकेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रामधून पालिकेच्या मालकीचे काही साहित्य चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांच्यासह नगरसेवक आशुतोष डुबल, अजय पावसकर, शिवाजी पवार, सुमित जाधव, गणेश पवार, अतुल शिंदे, रमेश वायदंडे, शिवराज माने, सचिन वास्के यांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जलशुद्धीकरण केंद्रातून नेमके कोणते आणि किती साहित्य चोरीस गेले, याची सविस्तर यादी देण्यात यावी. सदर साहित्य नगरपरिषदेच्या कोणत्या मालमत्ता नोंदवही, स्टॉक रजिस्टरमध्ये नोंदवले होते, त्याची माहिती आणि संबंधित नोंदींच्या प्रती द्याव्यात.
याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे का? असल्यास त्याची प्रत, गुन्हा क्रमांक आणि दिनांक, चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण अंदाजे किंमत किती असून त्यामुळे पालिकेचे एकूण आर्थिक नुकसान किती झाले आहे, याचा अहवाल द्यावा. भविष्यात अशा प्रकारे नुकसान किंवा चोरी होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, याचीही माहिती द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात चोरट्यांचा डल्ला, चौकशी करण्याची भाजप नगरसेवकांची मागणी, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन
by Team Satara Today | published on : 04 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा