मंगळवार पेठेतील पोस्ट ऑफिस कार्यालय तातडीने सुरू व्हावे

पालिकेच्या इमारतीत जागा मिळूनही विलंब; समर्थ परिसर जेष्ठ नागरिक संघाची मागणी

by Team Satara Today | published on : 11 July 2025


सातारा : मंगळवार पेठ येथील सिटी सर्वे नंबर 195 या सातारा नगरपालिकेच्या इमारतीत मंगळवार तळे पोस्ट ऑफिस साठी 32 चौरस मीटर जागा मंजूर आहे. तळमजल्याची जागा सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप हस्तांतरित झालेली नाही. मंगळवार तळे परिसरातील नागरिकांना राजपथावर टपाल कार्यालयात यावे लागते. त्यामुळे मंगळवार तळे पोस्ट ऑफिस तातडीने सुरू करावे, अशी मागणी समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

येत्या 21 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन होत आहे. या लोकशाही दिनामध्ये या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास ज्येष्ठ नागरिकांनी प्रसंगी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मंगळवार तळे पोस्ट ऑफिस हे दरे गाव, महादरे परिसर, मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, गोखले हौद धनिणीची बाग या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचे होते. पूर्वी हे ऑफिस अनंत इंग्लिश स्कूलच्या समोरील एका इमारतीत सुरू होते. सातारा नगरपालिकेने स्वतः ठराव करून 99 वर्षाच्या करारावर सिटी सर्वे नंबर 195 येथील पालिकेच्या इमारतीमध्ये 32 चौरस मीटर जागा नाममात्र शुल्कात मंगळवार तळे पोस्ट ऑफिस साठी दिली होती. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुद्धा या प्रकल्पाला सामाजिक हेतूने हिरवा कंदील दिला होता. 

मात्र असे असूनही अद्याप पोस्ट ऑफिस कार्यालयाला ही जागा हस्तांतरित झाली नाही. काही माजी नगरसेवक या कामाला अडथळा आणत असल्याची तक्रार विजय देशपांडे यांनी केली. या प्रकरणा संदर्भात लोकशाही दिनामध्ये आम्ही दाद मागितली आहे. या संदर्भात न्याय न मिळाल्यास प्रसंगी आम्हाला टपाल कार्यालयाच्या दारात उपोषणाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सरपंच, सदस्य हेच सक्षम हवेत : प्राचार्य विजय जाधव
पुढील बातमी
बनावट तणनाशक बनवणारी टोळी शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद

संबंधित बातम्या