फलटणला अतिरिक्त एमआयडीसी उभारणार : शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक व सत्कार समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

by Team Satara Today | published on : 28 May 2026


फलटण : फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यासाठी मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असून एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे, असे सांगत एमआयडीसीचे काम पूर्ण होणारच, असा ठाम विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना योग्य मोबदला दिला जाईल आणि शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाहीही त्यांनी दिली. फलटण येथील शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, खा. प्रा. ज्योती वाघमारे, माजी खासदार राहूल शेवाळे, जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, नगरसेवक अनिकेतराजे ना. निंबाळकर, विश्वजितराजे ना. निंबाळकर, उपसभापती अमोल सस्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जि. प. सदस्य सह्याद्री कदम, वैशाली कांबळे, ज्योती मोरे उपस्थित होत्या.

ना. सामंत म्हणाले, फलटण तालुक्यात संजीवराजे ना.निंबाळकर यांनी उभी केलेली पोटॅशियम बनवणारी कंपनी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीला विस्तारासाठी जागेची आवश्यकता भासल्यास एमआयडीसीमध्ये प्राधान्याने जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यातून फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल. संजीवराजे यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आम्हाला येथे रेडीमेड पक्षसंघटना मिळाली. पक्षाची ताकद वाढली. फलटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. आगामी काळात फलटणचा आमदार शिवसेना पक्षाचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटणच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले आहेत. आगामी काळात पक्ष अधिक प्रबळ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही जोमाने काम केले जाईल. दरम्यान, ना. उदय सामंत मार्गदर्शन करत असताना कार्यकर्त्यांनी संजीवराजे यांना आमदारकी द्या, अशी मागणी केली असता सामंत म्हणाले याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर तुमच्या भावना पोहोचवतो याबाबतीत ते अंतिम निर्णय घेतील, असे ना. सामंत म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आपदग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी कोषागारातून रक्कम खर्च करण्यास मान्यता - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा निर्णय
पुढील बातमी
माजी मंत्री महादेव जानकरांचा महागाई, शेतकरी व वंचितांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार; पाचगणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ‘सत्यशोधन शिबिर’ संपन्न

संबंधित बातम्या