सातारा : जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कॅनॉलचे पाणी वाहून नेणाऱ्या सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने ओडिसातील तीन कामगारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हिंगणगाव-आदर्की रस्त्यावर हि घटना घडली. हिंगणगाव ते आदर्की या रस्त्याखालून कॅनॉलचे पाणी पलीकडे नेण्यासाठी सिमेंटचे पाईप (पोटपाट) टाकण्यात आले आहेत. 'प्रिमियम चिक फिड प्रा. लि.' या कंपनीत काम करणारे तीन कामगार या पाईपमध्ये साचलेल्या पाण्यात काही कारणास्तव अडकले. पाण्याचा प्रवाह आणि पाईपमधील अरुंद जागेमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही आणि गुदमरून व पाण्यात बुडून या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
हे तिन्ही कामगार ओडिसा राज्यातील असून, ते प्रिमियम चिकफिड कंपनीत कामाला होते. ते हिंगणगाव येथील सुळवस्ती भागात राहत होते. ज्योर्तिमय भगिरथी नाईक (वय २२ वर्षे, रा. गिधीबास, बरिया, ओडिसा), सतिन बिरची नाईक (वय ३५ वर्षे, रा. उखेपाल, मयुरभंज, ओडिसा), श्रीराम जगाई हेबरंम (वय २० वर्षे, रा. चिकाडी, मयुरभंज ओडिसा) अशी मृतांची नावे आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शाम बाळू भगत यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हे कामगार पाईपमध्ये नेमके कशामुळे शिरले होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.