मुख्याध्यापकाकडून सहकारी शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; वाई पोलिसांकडून आरोपीला अटक

by Team Satara Today | published on : 17 July 2026


वाई : खावली ता. वाई येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून मुख्याध्यापकाने आपल्याच सहकारी महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाई पोलिसांनी संशयित मुख्याध्यापकाला तात्काळ अटक केली असून या घटनेमुळे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र विष्णू दीक्षित (रा. वडवली, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खावली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या पीडित महिला शिक्षिका काही दिवसांपूर्वी ५ दिवसांच्या शासकीय प्रशिक्षणासाठी पाचवड येथे गेल्या होत्या. त्या दरम्यान शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गाबाहेर चप्पल काढतात त्या ठिकाणी बसवून मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित याने हीन वागणूक दिली होती. प्रशिक्षण संपवून जेव्हा शिक्षिका शाळेत परतल्या, तेव्हा पीडित विद्यार्थ्याचे वडील संतोष वाडकर (रा. माची, ता. वाई) यांनी वर्गशिक्षिका म्हणून त्यांच्याकडे याबाबीची विचारणा केली.

​यानंतर संबंधित महिला शिक्षिकेने मुख्याध्यापक दीक्षित याला याबाबत विचारले असता, मुख्याध्यापकाने 'तुम्ही वर्गशिक्षिका आहात, तुम्हीच काय ते मिटवा, माझ्याकडे का आलात?' असे म्हणत दमदाटी करून थेट बघून घेण्याची धमकी दिली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. दि. १६ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास शाळेत मुख्याध्यापक दीक्षित हा वर्गातील दोन मुलांना मारहाण करत होता. ते पाहून संबंधित महिला शिक्षिका यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला व मुलांना परिपाठासाठी पाठवण्यास सांगितले.

​याच गोष्टीचा राग मनात धरून मुख्याध्यापक दीक्षित याने महिला शिक्षिकेला अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शिक्षिका धावत असताना दीक्षितने त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत महिला शिक्षिकेच्या पायावर गंभीर दुखापत होऊन मोठे वळ उठले आहेत. याप्रकरणी संशयित मुख्याध्यापकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

​दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून खावली शाळेतील ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसून, संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधित मुख्याध्यापकाचे निलंबन केले जाईल, अशी ग्वाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण; संशयित पोलिसांच्या ताब्यात
पुढील बातमी
राजपथ परिसरातील 'त्या' घटनेबाबतचे वृत्त चुकीचे; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे आवाहन

संबंधित बातम्या