मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ - डॉ. मृदुला गर्ग; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

by Team Satara Today | published on : 02 January 2026


मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ : डॉ. मृदुला गर्ग; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन 


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा)  : साहित्यिक क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. भारतीय भाषांमध्ये दलित साहित्य पहिल्यांदा मराठी भाषेतच लिहिले गेले. मराठी दलित साहित्यातूनच इतर भाषिक साहित्यिकांनी दलित लेखनाची प्रेरणा घेत, त्यांच्या मार्गाने जात आपल्या भाषांमध्ये दलित साहित्याची निर्मिती केली. त्यामुळे मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ ठरला आहे, असे प्रतिपादन देशपातळीरील ज्येष्ठ लेखिका, विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांनी केले. आपले बहुभाषिक संस्कृतीचे वैभव पाहताना असे लक्षात येते की, अनेक हिंदी लेखकांनी मराठी, बंगाली, उडिया आणि इतर भारतीय भाषांमधील साहित्यकृतींमधून प्रेरणा घेतली आहे. ही बहुभाषिक संपन्नता सर्वच प्रकारच्या लेखकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज (दि. २) डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मराठी साहित्याशी असलेले माझे भावनिक नाते कधीच ओसरलेले नाही तर काळाच्या ओघात ते अधिकच गडद होत गेले, असे सांगून डॉ. मृदुला गर्ग म्हणाल्या, मी वाचलेले पहिले मराठी पुस्तक म्हणजे शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय' ही कादंबरी. या कादंबरीचा मी हिंदी अनुवाद वाचला होता. महाभारतातील 'कर्ण' हा माझा आवडता नायक असल्यामुळे हे पुस्तक वाचणे हा माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि समृद्ध करणारा अनुभव ठरला. या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील 'छावा' ही कादंबरी देखील मी वाचली.

त्यानंतर ज्या लेखकाने माझ्या विचारांना पूर्णपणे कवेत घेतले, ते म्हणजे दलित साहित्यातील बंडखोर व्यक्ती नामदेव ढसाळ. "तुमच्या कवितेत केवळ राग आणि विद्रोहच का असतो?" या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते, "माझे कार्य लास्याचे नव्हे तर तांडवाचे सूर आळवते." त्यांचे हे शब्द माझ्या मनात आणि हृदयात खोलवर रुजले. १९८० पासून मी त्यांचे साहित्य आणि त्यांच्याबद्दल सातत्याने वाचत आले आहे. ते एक श्रेष्ठ कवी, लेखक आणि मानवी हक्कांचे पुरस्कर्ते होते. जातिभेद नष्ट करण्यासाठी आणि दलित अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी 'दलित पँथर' ही लढाऊ संघटना उभी केली. २०१४ पर्यंत ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. त्यांच्या कवितांचा दिलीप चित्रे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘अ करंट ऑफ ब्लड’ ('A Current of Blood') मी वाचला आहे. तो चळवळीतील सर्वच कर्त्यांसाठी 'बायबल' ठरला. त्यांच्या पत्नी मलिका अमर शेख या सुद्धा तितक्याच प्रतिभावंत लेखिका आणि दलित साहित्यातील पहिल्या महिला कवींपैकी एक आहेत.

नादमेव ढसाळ यांच्या दलित साहित्याविषयीची आठवण सांगताना मृदुला गर्ग म्हणल्या, माझ्या नातीने अमेरिकेतील 'स्क्रिप्स' (SCRIPPS) कॉलेजमध्ये 'विद्रोही मौखिक कविता' ('Speaking Poetry') या विषयावर लिखाण करताना तिच्या प्रबंधात नामदेव ढसाळ यांच्या ‘अ करंट ऑफ ब्लड’मधील कवितांचा समावेश केला. या वेळी फक्त अमेरिकन कवींचेच संदर्भ द्यायला हवेत, असे प्राध्यापकांनी सांगितल्यानंतर तिने ठामपणे उत्तर दिले की, "नामदेव ढसाळ आणि मलिका अमर शेख यांच्यासारख्या मराठी दलित कवींच्या उल्लेखाशिवाय 'विद्रोही कवितेचा' इतिहास अपूर्ण आहे." शोषितांच्या आणि स्त्रीवाद्यांच्या लढ्यासाठी तिने दिलेली ही एक मोठी साक्ष होती.

उर्मिला पवार आणि शरणकुमार लिंबाळे यांसारख्या इतरही दिग्गज दलित लेखकांची आत्मचरित्रे मला भावली आहेत आणि त्यांना भेटण्याचा योगही आला आहे.  एकाही स्त्री पात्राशिवाय  असलेली भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' ही कादंबरी देखील मी वाचली आहे. त्या कादंबरीने मला अक्षरश: खिळवून ठेवले. लेखकाची सर्जनशीलता ही स्त्री-पुरुष असा भेद न करता प्रकट होऊ शकते हे मला यातूनच पटले. नेमाडे यांची ज्ञानपीठ विजेती महागाथा 'हिंदू' ही देखील मी वाचली आहे.

अनेक मराठी नाटककारांच्या कलाकृतींनीही मला प्रभावित केले आहे. यातील महत्वाचे नाव म्हणजे विजय तेंडुलकर. 'शांतता! कोर्ट चालू आहे' आणि 'सखाराम बाईंडर' ही नाटके विद्रोह आणि प्रस्थापितांविरोधी विचार मांडताना दिसतात. महेश एलकुंचवार हे माझे सर्वात आवडते नाटककार आहेत. त्यांच्या नाटकांची व्याप्ती अफाट आहे. पुरुष असो वा स्त्री, मानवी दुःखाप्रती असलेली त्यांची सखोल सहानुभूती मला सर्वात जास्त आकर्षित करते. यात ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘पार्टी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रतिबिंब’ आणि ‘सोनाटा’ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

मला एक गोष्ट मान्य करावी लागेल की, नाट्यक्षेत्रातही हिंदीला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मराठी आणि बांगला रंगभूमी आजही आम्हा हिंदी भाषिकांना प्रेरणा आणि आनंद देत असते. त्यांच्या प्रभावामुळेच आम्ही अर्थपूर्णतेने रंगभूमीकडे वळत आहोत.

आजचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या 'झाडाझडती' या कादंबरीचा इंग्रजी अनुवादही मी वाचला आहे. या कादंबरीत धरणग्रस्त आणि विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या सामान्य लोकांच्या संघर्षावर भाष्य करण्यात आले आहे. जमिनी, घरे आणि उपजीविका गमावलेल्या सामान्यांची व्यथा यात मांडली आहे. सामाजिक आणि साहित्यिक दृष्टीने पाहता, 'झाडाझडती' ही एका बिगर-दलित लेखकाने लिहिलेली असली, तरी ती कुठल्याही दलित साहित्याइतकीच निर्भीड आणि विद्रोही आहे. विश्वास पाटील यांच्या 'द ग्रेट कांचना सर्कस' या कादंबरीमधून सर्कसमधील जीवन, त्यातील प्राणी आणि जीवावर उदार होऊन खेळ करणारे कलाकार यांचा त्यांनी केलेला अभ्यास थक्क करणारा आहे. प्रकाशकांच्या विनंतीवरून मला या कादंबरीच्या हिंदी अनुवादाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळाली. त्या कादंबरीने मला जो अनुभव दिला, तो शब्दात मांडताना मला मनस्वी आनंद झाला आहे. 


१९९७ मध्ये ओमप्रकाश वाल्मिकींची 'जूठन', मोहनदास नैमिशराय यांची 'अपने-अपने पिंजरे' आणि तुळशीराम यांची 'मुर्दहिया' यांसारखी आत्मचरित्रे आली. दलित लेखकांच्या साहित्यकृतींमधून, आत्मचरित्रांमधून त्यांनी सहन केलेल्या अपार वेदना आणि मानवी हक्कांची पायमल्ली समोर येते. बिगर-दलित वाचकांसाठी ही पुस्तके सामाजिक वास्तवावरील श्रेष्ठ कादंबऱ्यांइतकीच प्रभावी ठरतात. किंबहुना, शतकानुशतके भारतीय समाजाला लागलेली 'जातिभेदाची' कीड कमी करण्याचे आणि विविध जातींमधील अंतर मिटवण्याचे महत्त्वाचे कार्य या साहित्याकृती करत असताता. 

आज सर्वच भारतीय भाषांमध्ये दलित साहित्याचा उगम झाला आहे. यात अजय नावरियांसारखे तरुण लेखक आपल्या 'तीसरी दुनिया' सारख्या लघुकथांतून दलितांसमोरील आव्हाने मांडत आहेत. कौशल्या बैसंत्री यांनी 'दोहरा अभिशाप' हे हिंदीतील पहिले दलित महिला आत्मचरित्र लिहिले. यात त्यांनी जातीय शोषणासोबतच लैंगिक शोषणाचे पदर उलगडले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी नागपूरजवळील त्यांच्या पूर्वजांच्या संघर्षाबद्दल लिहिले. त्या नागपूरमध्ये वाढल्यामुळे त्यांच्या लेखनावर मराठवाडा आणि मराठी दलित साहित्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

तमिळ लेखिका 'बामा' यांचे 'करुक्कू' हे आत्मचरित्र जगभरात गाजले. तसेच मल्याळममधील के. जे. बेबी हे कवी आणि चित्रपट निर्माते म्हणून जगप्रसिद्ध आहेत. ही बहुभाषिक संपन्नता सर्वच प्रकारच्या लेखकांसाठी प्रेरणादायी आहे. याच वैविध्यामुळेच आज मला 'मराठी साहित्य संमेलनात' हिंदीतून संवाद साधता येत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हिंदी भाषा सक्तीला सांस्कृतिक कारणास्तव विरोध हिंदी भाषा सक्तीवरून प्रा. मिलिंद जोशी यांनी शासनाला ठणकावले; मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कौडकौतुक कशासाठी?
पुढील बातमी
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीचीच, प्रादेशिक भाषांचा आकस कशासाठी ? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

संबंधित बातम्या