फलटण तालुक्यातील सोमंथळीतील करंज ओढ्यावरील नव्या पुलाचा स्लॅप कोसळला; ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा संताप

by Team Satara Today | published on : 23 February 2026


फलटण : सोमंथळी, ता. फलटण येथील करंज ओढ्यावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण पुलाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असतानाच मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाच्या वरील मजल्यावरील (स्लॅप) काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने संपूर्ण बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट होत असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी जोर धरला आहे.

सोमंथळीतील करंज ओढ्यावरील पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. हा पूल टिकाऊ व दर्जेदार व्हावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ संघर्ष केला होता. विविध वृत्तपत्रांतूनही या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर या पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली. मात्र, काम सुरू होताच पुलाचा स्लॅप कोसळल्याने ठेकेदाराच्या कामगिरीवर संशयाची छाया पसरली आहे.

काम सुरू असतानाच पुलाचे बांधकाम ढासळत असेल, तर उर्वरित कामकाजाचा दर्जा काय असणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बांधण्यात येणाऱ्या पुलाचा स्लॅप कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जर बांधकामाच्या टप्प्यातच पूल कोसळत असेल, तर पूर्ण झाल्यानंतर तो सुरक्षित राहील याची काय हमी?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


    या घटनेची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच पुलाचे काम दर्जेदार साहित्य व तांत्रिक देखरेखीखाली पुन्हा करावे, अशी ठाम मागणी सोमंथळी व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


    सोमंथळी येथील करंज ओढ्यावरील सुरू असलेला नविन पुलाच्या वरील मजल्यावरचे स्लॅप कोसळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन दुसर्‍या ठेकेदार द्यावे अशी मागणी होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी.

     - पोपट गोफणे (सोमंथळी)



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतही जनतेचा कौल मान्य करून महायुती विजयी होईल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुढील बातमी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात झाडांची केली लागवड ; १०५ गावांच्या प्रतिनिधींना भेटून मुंबईला रवाना

संबंधित बातम्या