कराडमधील वारुंजी फाटा येथे अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई; सहा व्यावसायिक खोकी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त

by Team Satara Today | published on : 29 September 2026


कराड : कराड-चिपळूण महामार्गालगत वारुंजी फाटा येथे अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावर प्रशासनाने मंगळवारी पहाटे धडक कारवाई केली. सकाळच्या आधीच सुरू झालेल्या या कारवाईत महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. महसूल, पंचायत समिती आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वारुंजी येथील गणेश मंदिरासमोरील कऱ्हाडच्या दिशेने येणाऱ्या बाजूला ही खोकी होती. संबंधित अतिक्रमणधारकांना प्रशासनाने सुमारे १५ दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. दोन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवघ्या चार तासांत ही अतिक्रमणे हटविण्यात आली.
वारुंजी फाटा येथे यापूर्वी २०१६ मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा या परिसरात व्यावसायिक खोक्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे नोटीस बजावल्यानंतर प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला.
कारवाईदरम्यान तहसीलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह महसूल, पंचायत समिती आणि पोलिस विभागातील सुमारे ७० अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कारवाई सुरळीत पार पडावी, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहा महिने उलटूनही शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मुंबईत मातंग समाज आक्रमक; उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज
पुढील बातमी
पुण्याच्या हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो कंपनीच्या सीएसआर निधीतून ऊर्मी संस्थेची यशोधन ट्रस्टला मदत

संबंधित बातम्या