सातारा : कोंढवे गावाच्या हद्दीत विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणार्या युवकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून दुचाकीसह 90 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मेहताब जब्बार शेख (वय 23, रा. कोंढवे, ता. सातारा) हा हमदाबाद, पोस्ट कोंढवे येथील विमल पान स्टॉल परिसरात देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी सापळा रचून कारवाई करण्यात आली.
या कारवाईत आरोपीकडून मनोरंजन संत्रा ब्रँडच्या 90 मिलीच्या नऊ सिलबंद बाटल्या, 180 मिलीची एक देशी दारूची बाटली तसेच नंबर प्लेट नसलेली एप्रिलिया कंपनीची दुचाकी असा एकूण 90 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद डाकरे यांच्या फिर्यादीवरून संबंधित युवकाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.