महायुतीची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी आणि अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी साताऱ्यातील जागांवर पाणी सोडले : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Team Satara Today | published on : 01 November 2026


सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी आणि अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी साताऱ्यातील जागांवर पाणी सोडत राजकीय तडजोड स्वीकारावी लागली, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मतदान प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जागावाटपातील अंतर्गत घडामोडी आणि राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मतभेद आणि संघर्ष उफाळून आला होता. त्या कटू अनुभवाची पुनरावृत्ती या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत होऊ नये, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अत्यंत कडक आणि स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार पूर्ण समन्वयाने आणि ताकदीने काम करत असताना सातारा जिल्ह्यातही सर्व घटक पक्षांमध्ये सुसंवाद आणि समतोल राखणे काळाची गरज होती. सातारा तालुक्यामध्ये मतदारांचे संख्याबळ आणि स्वतःची राजकीय ताकद सर्वाधिक असतानाही, केवळ युतीचा धर्म पाळण्यासाठी काही जागांवर तडजोड करावी लागली. अधिक जागांवर हक्क सांगण्यापेक्षा युतीमधील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे आणि सहकारातील एकसंधता टिकवणे यालाच आपण सर्वोच्च प्राधान्य दिले, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर सोपवलेली समन्वयाची आणि तडजोडीची महत्त्वाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली असून, कोणत्याही परिस्थितीत महायुतीत फूट पडू दिली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटप हे केवळ स्थानिक सत्ता समीकरणांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण महायुतीची वज्रमूठ अधिक घट्ट करण्यासाठी आखलेल्या व्यापक रणनीतीचाच एक भाग असल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले. या संयमी भूमिकेमुळे सहकार क्षेत्रातील अनावश्यक संघर्ष टळून महायुतीचा पाया जिल्ह्यात अधिक भक्कम झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पैशांच्या व्यवहारातून साताऱ्यातील स्क्रॅप व्यावसायिकाला धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
‘महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही, पण आपापसांतील संघर्ष टाळा’ : खासदार उदयनराजे भोसलेंचा नेत्यांना संयमाचा सल्ला

संबंधित बातम्या