सातारा : भाजपासाठी काम करणार्या कॉंग्रेस नेत्यांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी अहमदाबाद (गुजरात) येथे केले. त्याप्रमाणेच भाजपसाठी काम करणार्या जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांना जिल्ह्याचे कॉंग्रेस नेतृत्व हाकलणार का, असा सवाल कॉंग्रेस समर्थक विशाल पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे.
जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्ष, त्यामधील नेते, पदाधिकारी जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदापासून ते विविध पदांवर कार्यरत आहेत. ते जोपर्यंत आपल्या जबाबदार्या पार पाडणार नाहीत, तोपर्यंत लोक कॉंग्रेसला मतदान करणार नाहीत. आणि हे गेल्या काही निवडणुकांमधून दिसून आले आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसला ग्रामपंचायत पासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत फार मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र मागील काळातून दिसते. त्याला पूर्णपणे जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्ष आणि आत्ता असलेले नेते, पदाधिकारी जबाबदार आहेत. कारण ते भाजपाशी आतून हातमिळवणी करून, त्यांना मदत होईल असे काम करून पक्षाला जिल्ह्यातून संपवण्याचे काम करत आहेत.
जिल्ह्यात कॉंग्रेसमधील नेते व पदाधिकारी यांच्यात दोन प्रकारचे लोक आहेत. एक जनतेशी प्रामाणिक आहेत, त्यांच्यासाठी लढतात, त्यांच्यात कॉंग्रेसची विचारधारा आहे. दुसरे लोकांपासून तुटलेले आहेत, जे लोकांचा सन्मान करीत नाहीत आणि ते आतून भाजपासोबत मिळालेले आहेत. अशा लोकांना शोधून काढून दूर करण्याची गरज आहे. या दोन्ही गटांना वेगळे केले जात नाही, तोपर्यंत जिल्ह्यात लोक कॉंग्रेसवर विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका विशाल पवार यांनी केली आहे.