सातारा : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकर्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी 689 कोटी 52 लाख 61 हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
ना. पाटील यांनी नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयात भरपाईबाबतची घोषणा केली. सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 142 शेतकर्यांचे 21.60 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. त्यासाठी शासनाने 3 लाख 23 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7 लाख 74 हजार 313 शेतकर्यांचे 6 लाख 48 हजार 533.21 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे 2 लाख 38 हजार 530 शेतकर्यांचे 1 लाख 51 हजार 222.6 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यांना 128 कोटी 55 लाख 38 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. सांगली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे 13 हजार 475 शेतकर्यांचे 4 हजार 74.27 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी 7 कोटी 45 लाख 38 हजार रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकर्यांना मदत करण्यात शासन संवेदनशील असून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांच्या पंचनामा अहवाल शासनास प्राप्त होताच शासनाने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली.
ना. मकरंद पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री, महाराष्ट्र राज्य