वाई : कुसगाव (ता. वाई) येथील क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, विलास येवले, राजेंद्र सोनवणे, आनंद चिरगुटे, संपत महांगडे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
त्यानुसार क्रशर व खाणपट्टा मंजुरीबाबत वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करून आठवडाभरात अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, क्रशर मंजुरीस हरकत असलेल्या कुसगाव, एकसर व व्याहळी कॉलनी ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा केल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.