पर्यटक सुरक्षा दलाचा महाबळेश्‍वरमधील प्रयोग आता मुंबईमध्ये

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती; आवश्यक सुविधांची निर्मिती करणार

by Team Satara Today | published on : 07 August 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा प्रायोगिक प्रकल्प महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या दरम्यान राबविण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांमध्ये या दलाच्या सहकार्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता आणि येथील पर्यटन संख्येमध्ये वाढ झाल्याचा दावा राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. हा प्रयोग आता मुंबईमध्ये केला जाणार असून मलबार हिल तसेच येथील पर्यटन स्थळांवर विशिष्ट ठिकाणी ही दले सक्रिय राहणार आहेत.
महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाच्या संदर्भाने शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले एक मे ते चार मे यादरम्यान महाबळेश्वर महोत्सवांमध्ये राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पर्यटन स्थळांवरील पर्यटकांची सुरक्षितता 25 जवानांची दोन दले त्यावेळी सक्रिय करण्यात आली होती. त्यातील एक दल महाबळेश्वर येथे, तर दुसरे दल पाचगणी येथे सक्रिय होते. यामुळे पावसाळ्यात सुद्धा महाबळेश्वरची पर्यटन संख्या वाढली आहे, असे ते म्हणाले.
मंत्री देसाई पुढे म्हणाले, पर्यटन स्थळावरील सुरक्षितता स्थानिक वारसा आणि कायद्याची माहिती देण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर पर्यटन पोलीस नियुक्त करण्यात येत आहेत. यासाठी राज्य सुरक्षा मंडळ आणि मेस्को यांना त्यांच्या उपलब्ध मनुष्यबळाची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांचे सहकार्य घेतले जात आहे. यामुळे शाश्वत पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटकांसाठी हेल्पलाईन, माहिती, केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म या सेवा पर्यटकांना मिळतील. त्यावेळी स्थानिक पोलीस आणि पर्यटन सुरक्षा दल हे समन्वयाने काम करून पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही यंत्रणा त्वरित हालचाल करेल, असेही ते म्हणाले, हा प्रयोग आता मुंबईमध्ये मलबार हिल व पाली हिल या दोन प्रमुख उच्चभ्रू वस्तींमध्ये केला जाणार आहे. समुद्रकिनारा तसेच ट्रायडेंट हॉटेल तेथून मरीन ड्राईव्ह यादरम्यानच्या पर्यटन स्थळांवर ही दले सक्रिय करण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी भक्कमपणे उभा राहील. राज्यात एकूण एक लाख कोटींची खाजगी गुंतवणूक व 18 लाख प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

दिव्यांगांचा संपूर्ण निधी खर्च होणार
दिव्यांगांचा निधी खर्च केला जात नाही, या प्रश्‍नावर बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दिव्यांगांना आम्ही नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यावर्षीपासून दिव्यांगांचा संपूर्ण निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्यात येणार आहे. जे खरेच दिव्यांग आहेत, त्यांच्याबाबत जिल्हा परिषदेकडून शिक्षक बदली संदर्भात अन्याय होत आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, दिव्यांग प्रमाणपत्रांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. जे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करतील, त्यांच्यावर कारवाई होईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पहिलाच चित्रपट फ्लॉप, अभिनय सोडून अमेरिकेला गेला
पुढील बातमी
वृद्धास जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या