सातारा : भारत निवडणूक आयोगाने देशभर मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण हाती घेतले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील २६ लाख ५१ हजार ३१७ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे आणि स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या त्रुटी दूर करून यादी अधिक अचूक व दोषविरहित करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, मागील २० वर्षांत विशेष सखोल पुनरिक्षण झाले नसून केवळ संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात आले होते. त्यामुळे मतदार यादीतील नोंदींची सर्वंकष पडताळणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार ६१५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांना पूर्वभरलेले गणना प्रपत्र वितरित करतील.
त्यानंतर भरलेली प्रपत्रे पुन्हा संकलित करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) देखील सहकार्य करणार आहेत. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
प्रारुप यादी ५ ऑगस्टला प्रसिद्ध
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ५ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती स्वीकारल्या जातील. सर्व हरकतींची सुनावणी पूर्ण करून ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नोंदी जुळवण्याचे काम ८९.७७ टक्के पूर्ण
जिल्ह्यातील मतदारांची माहिती २००२ मधील विशेष सखोल पुनरिक्षणातील नोंदींशी जुळविण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ८९.७७ टक्के नोंदींचे मॅचिंग पूर्ण झाले आहे. मतदारांना स्वतःची किंवा आई-वडील, आजी-आजोबा यांची जुनी मतदार यादीतील माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मिळवता येणार असून ती माहिती बीएलओ यांना देण्याचे आवाहन संतोष पाटील यांनी केले.
घर बंद आढळले तरी किमान तीन वेळा गृहभेटी
गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास संबंधित बीएलओ किमान तीन वेळा भेट देणार असून त्याची नोंद ठेवली जाईल. मतदारांना गणना प्रपत्र ऑनलाइन पद्धतीनेही भरता येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नोंदींची जुळवणी होणार नाही किंवा त्रुटी आढळतील, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.