सातारा : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले सर्व रस्ते व पुल आगामी पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी. तसेच राज्यभरात बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली रस्ते, पूल आणि इमारतीची कामे तातडीने मार्गी लावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबई येथे मंत्रालयात ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाची पावसाळापूर्व तयारी विषयी आढावा बैठक झाली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे ,सचिव (बांधकामे) संजय दशपुते, सहसचिव रोहिणी भालेकर, उपसचिव निरंजन तेलंग, संजय देगावकर, सचिन चिवटे आदी उपस्थित होते. बैठकीला दुरदृश्य प्रणालीव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रादेशिक मुख्य अभियंते तसेच सर्व जिल्ह्याचे अधिक्षक अभियंते उपास्थित होते.
राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी खडेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी. बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील तसेच खाजगीकरणांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच मुख्य अभियंता यांनी रस्त्यांवरील माहिती फलकांच्या गॅट्रीजची (Gantries) व पादचारी पुलांची (FOB) ची तपासणी करावी, खराब झालेल्या Gantries व FOBs काढून टाकण्यात यावेत. सर्वसाधारणपणे सदर Gantries चे संकल्पन वायुवेग १८० प्रतितास गृहीत धरुन तपासण्यात यावे. रस्त्यालगतचे जाहिरात फलक व माहिती फलक यांची टॅप्सनी करून खराब झालेले जाहिरात फलक, माहिती फलक काढून टाकण्यात यावेत. सर्व घाट रस्त्यांची तपासणी करून ते खड्डेमुक्त तसेच सुरक्षित राहतील याची विशेष खबरदारी घ्यावी, रस्त्यांवरील माहितीफलक वाचण्यायोग्य राहतील, तसेच रस्त्यावरील पट्टे मार्किंग्स, ब्लिंकर्स वाहन चालकास व्यवस्थित दिसतील, याची दक्षता घ्यावी.
पावसाळयापूर्वी कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करून पावसाळयात रस्ते खड्डे मुक्त व वाहतुकीस सुरळीत राहतील याबाबत नियोजन करावे. याचबरोबर पावसाळयात रस्त्याचे काम सुरू असल्यास काम सुरू असल्याबाबत माहिती फलक लावणे, बॅरेकेटींग करणे रिफ्लेक्टर्स लावणे आदी बाबींची विशेष दक्षता घेण्यात यावी. घाट रस्त्यांची पाहणी करून लूज रॉक्स काढून घ्यावे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी रस्ते वाहतुक पुर्वस्थित करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. तसेच पर्यायो रस्तेही सुस्थितीत ठेवण्यात यावेत. घाट रस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळयात तात्पुरते धबधबे तयार होतात त्या ठिकाणी पर्यटक थांबणार नाहीत, वाहने उभी करणार नाहीत याची दक्षता घ्यावी, नो पार्किंग, 'थांबू नये' अशा आशयाचे फलक अशा ठिकाणी लावावाय. जिल्हास्तरावर वाररुम तयार करून आपत्तीच्या वेळेस टोल फ्री नंबर कार्यान्वित करावा.
आपल्या अखत्यारीतील सर्व क्षेत्रिय अभियत्यांना यासाठी आवश्यक नियोजन करुन सतर्क राहण्याबाबत मुख्य अभियंता यांनी सूचना द्याव्यात, यासंदर्भात काळजीपूर्वक कार्यवाही न करणा-या अधिका-यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी बैठकीत दिला. दरवर्षी पाण्याखाली जाणारे पूल, मो-या या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात येत आहेत. ज्या पुलांची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम चालू आहे त्याठिकाणी असलेले डायव्हर्शन पक्के करून घ्यावे आदी सुचना ना. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी दिल्या. दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.