नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांविरोधात भाजपचा हल्लाबोल; साताऱ्यात जनआक्रोश मोर्चा

by Team Satara Today | published on : 25 April 2026


सातारा : नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांविरोधात भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने साताऱ्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सहभाग घेत विरोधकांवर जोरदार टीका केली.

महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात नारीशक्ती वंदन विधेयक हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. महिलांना लोकसभेत अधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी या विधेयकाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकीय हेतूने विरोधकांनी या विधेयकाला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केला.

सातारा जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र आता तो भाजपचा बालेकिल्ला बनला आहे, असा दावा करत आगामी निवडणुकांमध्ये महिला आघाडी विरोधकांना योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

देशातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण दिले. महिलांना संधी देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार सकारात्मक असून नारीशक्ती वंदन विधेयक ही त्याच भूमिकेची फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रेयवादातून विरोधकांचा नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध

नारीशक्ती वंदन विधेयक हे केवळ राजकीय निर्णय नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. विरोधकांनी केवळ श्रेय राजकारणासाठी या विधेयकाला विरोध केला. महिलांच्या हक्कांच्या प्रश्नावरही राजकारण करणे दुर्दैवी आहे. सातारा जिल्ह्यात महिला नेतृत्व सक्षमपणे पुढे येत असून विविध पदांवर महिला प्रभावी भूमिका बजावत आहेत. आगामी काळात महिला आघाडी अधिक ताकदीने काम करत विरोधकांना त्यांच्या भूमिकेबद्दल जनतेसमोर उत्तर देण्यास भाग पाडेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे जाहीर वाचन करून आ. संजय गायकवाड यांच्या धमकीचा साताऱ्यात निषेध
पुढील बातमी
प्रतापसिंहनगरात चाकू हल्ला; जखमी तरूणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

संबंधित बातम्या