पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्यांना मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील स्ट्रॉबेरी लागवडीवर परतीच्या पावसाचा परिणाम झाला आहे. सलग पावसामुळे जमिनीतील निचरा होत नसल्याने रोपांची लागवड ठप्प झाली आहे आणि आधीपासून लावलेली लागवड रोपे ओलसर वातावरणात बुरशीसारख्या रोगांचा सामना करत आहेत.
तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्यांसाठी यंदाचा हंगाम कठीण ठरला आहे. दिवाळीच्या सुमारास शेतकरी स्ट्रॉबेरी विक्रीसाठी तयार करतात. परंतु, यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली आहे. काही शेतकरी अजूनही रोप लावत आहेत. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने रोपांना धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपुरी, आंब्रळ, मेटगुताड, पांगारी आणि वाई परिसरातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शेतकर्यांनी तयार केलेल्या बेडमध्ये पाणी साचल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे सध्या स्ट्रॉबेरी लागवड करणे अशक्य झाले आहे. काही शेतकर्यांनी पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. यामुळे पावसाचा परिणाम स्ट्रॉबेरी उत्पादनावर होणार असल्याचे दिसत आहे. राज्यात स्ट्रॉबेरी उत्पादनाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वर, पाचगणी, वाई भागात झालेल्या पावसाने स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. लागवड उशीरा होणार असल्याने या हंगामात 30 ते 40 टक्के उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे फळांचेही आर्थिक गणित कोलमडणार आहे.
स्ट्रॉबेरी हाच आमचा मुख्य हंगामी उत्पन्नाचा आधार आहे. काही दिवसांपासून सतत पाऊस आहे. स्ट्रॉबेरी बेडमध्ये पाणी साचल्याने लागवड पूर्णपणे ठप्प झाली आहे. खर्च केलेले पैसे अडकले आहेत लागवड उशिरा झाल्यास आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
- संदीप पांगारे, पांगारी