सातारा : अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्य उजाडला तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आले असून, गुरुवारी होणाऱ्या विशेष फेरीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोर्टलवर रिक्त जागा निश्चित होणार आहेत. १९ ऑगस्टला एक वाजल्यापासून ते २० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन व अल्पसंख्याक) कोट्यातील जागा दाखविणे, उद्या (गुरुवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष फेरीअंतर्गत जागा दाखविण्यात येणार आहेत. ता. १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विशेष फेरीअंतर्गत नवीन नोंदणी, भरलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती, राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण (एटीकेटी) विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी व प्रवेश अर्ज प्राधान्यक्रम नोंदविण्यात येणार आहे.
त्यानंतर १९ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता विशेष फेरीत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयात जागा निश्चितीची यादी जाहीर होणार आहे, तर त्याच दिवशी एक वाजल्यापासून ते २० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहेत. दरम्यान, ‘ओपन टू ऑल’ या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश ५० टक्के झाले आहेत, त्या महाविद्यालयांना अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे अकरावीचे वर्ग काही महाविद्यालयांत सुरू झाले असून, काही ठिकाणी लवकरच सुरू होणार आहेत.