सातारा : समाजप्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा (जि. रायगड) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी गणेशोत्सव काळातील निर्माल्य संकलन व कंपोस्ट खतनिर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सव काळात जलप्रदूषण थांबण्यासाठी, पर्यावरण संतुलनासाठी येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात आली, तसेच विसर्जनावेळी संगम माहुली, बुधवार नाका कृत्रिम तळे (सातारा), महागणपती घाट (वाई), कृष्णा घाट (भुईंज), प्रीतिसंगम घाट (कराड), पाचवड फाटा (धोंडेवाडी), येरळा नदी (वडूज), येरळा नदी (पुसेगाव), कोयना नदी मूळगाव पूल (पाटण), निसरे पूल मारुल हवेली या दहा ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले.
या पर्यावरणपूरक उपक्रमात एक हजार ७०१ सदस्यांनी सहभाग घेतला. त्यांनी एक टन ७२१.४१ किलोग्रॅम निर्माल्य संकलन करून त्याचे खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात केली. निर्माल्य संकलन व खतनिर्मिती उपक्रमात गणेशभक्तांकडून निर्माल्य संकलन केल्यामुळे नदी, तलाव, बंधारा, घाट येथील होणारे जलप्रदूषण थांबविण्यासाठी प्रशासनावरील बराचसा ताण कमी होण्यास मदत झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. या उपक्रमाचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील व विविध विभागांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले
संकलित निर्माल्यातील प्लॅस्टिक पिशव्या, तसेच विघटन न होणाऱ्या वस्तू, पदार्थ निवडून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. ६७६.६७ प्लॅस्टिक वेगळे करण्यात आले, तसेच शेकडो किलो प्लॅस्टिक कऱ्हाड नगरपालिकेच्या प्लॅस्टिक संकलन केंद्रात पाठवण्यात आले.