कोरेगाव : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा कोरेगाव तालुक्यात शनिवार, दि. ७ मार्च रोजी सातारारोड येथे शुभारंभ होणार आहे. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील सर्व दहा महसूल मंडळे तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली.
कोरेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अभियानाचा उद्देश, स्वरूप आणि नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण व निवासी नायब तहसीलदार सुनीता धीमते उपस्थित होत्या.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध महसूल विषयक योजना, सेवा आणि सवलती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे हा आहे. शासनाने जनहितासाठी राबविलेल्या उपक्रमांचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा सुलभपणे मिळाव्यात, यासाठी हे अभियान प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे कुदळे यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने लोकांकडे धावत जाऊन सेवा द्यावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असून नागरिक, शेतकरी, महिला, शेतमजूर व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत भव्य शिबिरे भरविण्यात येणार आहेत. महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये एकाच दिवशी महसूल विभागाच्या १५ हून अधिक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा
अभियानांतर्गत खालील सेवा शिबिरस्थळीच दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे वितरण, उत्पन्न, रहिवासी, जाती व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, अकृषिक अर्थात एन. ए. तरतुदींबाबत मार्गदर्शन व परवानगी, बिनशेती कर वसुली प्रक्रियेबाबत माहिती,
सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश
विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वितरण, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश
घरांसाठी पट्टे वाटप
ई-मोजणी अर्ज स्वीकृती
ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी,
भूसंपादन व अकृषिक प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे
अकृषिक एन. ए. परवानगीदेखील शिबिरातून देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य मिळकतधारकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये नियोजित कार्यक्रमांद्वारे अर्ज स्वीकृती, तक्रार निवारण व प्रमाणपत्र वितरण यासारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या अभियानाचा सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
७ मार्च रोजी सातारारोड येथे होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यास नागरिक, शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही धीमते यांनी नमूद केले.