सातारा : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादनात घट होणार आहे. कारखाने मागे लागतील; परंतु शेतकर्यांनी ऊसतोडीची गडबड करू नये, अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. यंदा दराची काळजी करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्यात उसाला उच्चांकी दर मिळवून देईल, अशी ग्वाही संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
ऊस दराबाबत संघटनेच्यावतीने गोपूज, ता. खटाव येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सूर्यकांत भुजबळ, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, अर्जुन साळुंखे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, अनिल कचरे, शरद खाडे, सचिन पवार, संतोष तुपे, सचिन जाधव, जयवंत खराडे, बापू निंबाळकर, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, रिकव्हरी व काटा चोरी करून, काळा पैसा कमावण्याचा कारखानदारांचा धंदा आहे. 1966 च्या कायद्यानुसार 14 दिवसांच्या आत ऊस बिले अदा करायची असताना, शेतकर्यांना वर्षभर वाट पहावी लागत आहे. कारखानदार एक टनाचे पावणेसात हजार रुपये करत आहेत, पण शेतकर्यांना पैसे द्यायचे म्हटले की, परवडत नसल्याचे सांगतात. यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांमध्ये प्रचंड स्पर्धा होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी गडबड करू नये. कष्टाने पिकवलेल्या उसाचे योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. खांडसरी व गूळ उत्पादन करणारे कारखानेसुद्धा एफआरपीच्या कायद्यात आहेत याची नोंद घ्या.
अनिल पवार, तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव, दत्तात्रय घार्गे, जयवंत खराडे, प्रा. डावरे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, लांडेवाडी, उंबर्डे, वडूज, चितळी, बनपुरी येथील ऊस उत्पादक शेतकर्यांनी संघटनेमध्ये प्रवेश केला.