प्रतापसिंहनगरमधील गुन्हेगारी टोळी चार महिने हद्दपार; पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचा कारवाईचा बडगा

by Team Satara Today | published on : 03 November 2026


सातारा : सातारा शहर परिसरात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या प्रतापसिंहनगर येथील टोळीला सातारा जिल्ह्यातून चार महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख जीवन महादेव गायकवाड (वय २९) याच्यासह अनिकेत बापू गायकवाड (वय २९) आणि सुनील सुभाष गायकवाड (वय ३२, सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित तिघांविरुद्ध सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या टोळीच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संबंधित टोळीला संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल विजय पाटील यांनी केली.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेले पुरावे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन तिन्ही आरोपींना चार महिन्यांसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला.
जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध आगामी काळात हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीएअंतर्गत कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व त्यांच्या पथकाने, तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आवश्यक पुरावे सादर केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वबळावर लढलो असतो तर सर्वच्या सर्व जागा जिंकल्या असत्या; महायुतीतील दगाफटक्यावर जयकुमार गोरेंची नाराजी; अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
पुढील बातमी
पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

संबंधित बातम्या