सातारा शहर हरित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे

ना. शिवेंद्रसिंहराजे; हरित सातारा अभियानांतर्गत २ हजार झाडांची लागवड

by Team Satara Today | published on : 01 June 2025


सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन व सातारा शहर हरित करण्याच्या उद्देशाने सातारा शहरात 'हरित सातारा' अभियानाचा शुभारंभ उत्साहात झाला असून या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागामध्ये ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत २ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. 

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोशी, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह सातारा शहरातील विविध वृक्षप्रेमी संस्था तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करून सातारा शहर 'हरित' करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.  

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे - शिक्रापूर - जेजुरी-लोणंद राज्य मार्गावर (कि.मी. १९०/०० ते कि.मी. १९३ / ३००) पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान ३.३ कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा झाडांची लागवड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, बकुळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे. तसेच सातारा नगरपरिषदेच्यावतीने शहरातील अयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक- नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशी विविध प्रकारची झाले लावण्यात आली. 

साताऱ्याचा निसर्ग आपल्यासाठी एक अमूल्य देणगी आहे. या देणगीचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे. झाडं लावा, झाडं वाढवा हे केवळ घोषवाक्य न राहता कृतीतून दिसलं पाहिजे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी झाडांचे संगोपन आणि देखभाल करण्याची  शपथ घेतली. यावेळी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सातारा नगरपरिषद आणि  सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना नगरपरिषदेच्या वतीने तुळशीचे रोप भेट देण्यात आले तसेच उपक्रमात सहभागी सर्वांना नगरपरिषदेच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले. या उपक्रमात शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसरातील रिकाम्या जागांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारची स्थानिक फळझाडे, छायादायक झाडे व औषधी वनस्पती लावण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
जनता बँकेच्या सुलभ कर्ज योजनांचा लाभ घ्यावा : अमोल मोहिते

संबंधित बातम्या