सातारा : गणेशोत्सवात दुधाला मागणी वाढते. विशेषत: गायीच्या दुधाला अधिक मागणी असते. त्यातच सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरला मागणी वाढू लागल्याने खासगी दूध संस्थांनी दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात लागून येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर हे दर आणखी वाढून ३८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात दरवाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सुखकर्त्याच्या आगमनाने कृपादृष्टी झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
यावेळेस जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी श्री गणेश सुखकर्ता ठरला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खासगी दूध संघांनी गायीच्या दूध दरात प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे गायीच्या दुधाचे दर ३३ ते ३५ रुपयांच्या दरम्यान झाले आहेत. याचा थेट फायदा जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गणेशोत्सवापासून पुढे अनेक सण एका पाठोपाठ येतात. त्यामुळे या सणांसाठी गायीच्या दुधाला प्रचंड मागणी वाढते, तसेच जागतिक बाजारपेठेतही दुधाची मागणी वाढली आहे.
बाहेरच्या देशात दुधाचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे भारतातील दूध पावडरला या बाहेरच्या देशातून मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय खासगी दूध संघांनी घेतला आहे. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गायीच्या दुधाला प्रतिलिटर एक ते दोन रुपये वाढ केली आहे. त्यामुळे आता गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३३ ते ३५ रुपये दर मिळत आहे. वाढलेल्या दराचा जिल्ह्यातील ५५ हजार दूध उत्पादकांना फायदा मिळणार आहे. आगामी काळात हा दर ३८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तसेच म्हशीच्या दुधाच्या दरातही एक रुपयांनी वाढ केल्याचे खासगी दूध संघांकडून सांगितले जात आहे. ऐन गणेशोत्सवात गायीच्या दुधाची दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
गायीच्या दूध उत्पादनात वाढ होण्याबरोबरच त्याचे संकलनही मोठ्या प्रमाणात व्हावे, या उद्देशाने खासगी दूध संघांनी दरवाढीच्या दृष्टीने अनुकूल निर्णय घेत उत्पादकांना दिलासा दिला आहे. जागतिक स्तरावर नैसर्गिक आपत्तीसह अन्य कारणांनी दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे दुधाची उपलब्धता कमी होत असल्याने त्यावर पर्याय म्हणून दूध पावडरची मागणी वाढली आहे. परिणामी, खासगी दूध संघांनी दूध पावडर निर्मितीवरही भर देण्याच्या उद्देशाने केलेली दरवाढ उत्पादकांसाठी मात्र दिलासादायक ठरली आहे.