सातारा : सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, अंशकालीन, कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० एप्रिल २०२६ पासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. जिल्हा संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, शासनाकडून वारंवार लक्ष वेधूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संपाचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संपाच्या काळात दररोज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र येऊन जोरदार निदर्शने करणार आहेत. या आंदोलनाचा मोठा परिणाम शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची सविस्तर माहिती संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक नेताजी दिसले यांनी दिली असून, मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.