सातारा : "प्रत्येक बालिकेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अंश आहे. मात्र तो समाजातील सर्व घटकांनी जागृत ठेवावा .तसेच तो जपायला हवा आणि वृद्धिंगत करायला हवा. त्यातूनच कर्तबगार स्त्रिया समाजाला प्राप्त होतील ,"असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या हस्ते "बालिकापूजन" करण्यात आले .त्यावेळी ते बोलत होते ,यावेळी मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर तसेच इतर शिक्षक आणि सर्व बालिका उपस्थित होत्या.
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले,"बालिका दिन हा केवळ उत्सव नसून ती जबाबदारी आहे. प्रत्येक बालिका तसेच सर्वच विद्यार्थ्यांमध्ये संत , समाजसुधारक आणि समकालीन समाजसेवक यांच्या विचारांचे बीजारोपण करायला हवे. शाळेतल्या, महाविद्यालयाच्या शैक्षणिक टक्केवारी बरोबरच संवेदनशील नागरिक घडण्यासाठी, उत्कृष्ट समाज घडविण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये तरुण पिढीमध्ये निर्माण व्हायला हवी. केवळ जयंती पुण्यतिथी निमित्त महान व्यक्तींना अभिवादन करून चालणार नाही; तर कायमच त्यांचे विचार आणि कार्य तळागाळातील घटकापर्यंत पोहोचायला हवेत.हे काम अव्याहत आणि निरंतर हवे. ही जबाबदारी केवळ शिक्षकांची नसून प्रत्येक सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकाची आहे. सावित्रीबाईंनी समाजसेवा प्राणपणाने तर केलीच परंतु अत्यंत अर्थपूर्ण कविता लिहून साहित्यसेवा देखील केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठीशी त्या ठामपणे उभा राहिल्या. १८४८ मध्ये या दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली तो क्षण क्रांतिकारी होता. १८९० मध्ये ज्योतिराव यांच्या निधनानंतरही सावित्रीबाई तितक्याच कणखरपणे कार्यरत राहिल्या. बालिकापूजन हे स्त्रीत्वाचे पूजन आहे."
या अनोख्या कार्यक्रमासाठी संस्थापक अमित कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले.श्रीमती सुपेकर यांनी आभार मानले.