कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा आणि अफवा निराधार आहेत. पक्षाचे कोणत्याही राजकीय पक्षात विलीनीकरण होणार नाही, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले. दरम्यान, पक्ष सक्षमपणे कार्यरत असून भविष्यातही स्वतंत्रपणे काम करत राहील, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यासह देशातील विविध भागांत पक्ष ताकदीने संघटन विस्तार आणि राजकीय लढती लढत आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जाणीवपूर्वक आमच्या पक्षाबाबत विलीनीकरणाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यापूर्वीही पक्षाचे स्व. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. अशा बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
इंडिया आघाडीच्या बैठकीस पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. देशात भाजपला प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी इंडिया आघाडीने एकसंधपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. खा. शरद पवार यांनी इंडिया आघाडीला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे लढले तर देशाच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळू शकते, असेही ते म्हणाले.