मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.
राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली.
शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
शपथविधी सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, लोकायुक्त न्या. (नि.) विद्यासागर कानडे तसेच राजस्थान, झारखंड, दिल्ली, अलाहाबाद, कर्नाटक व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.
सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी न्या. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.