देहरादून: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सोमवारी सकाळी ओव्हरटेकच्या वादातून सुरू झालेल्या थराराने एका निष्पाप निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे.
दिल्लीची नंबर प्लेट असलेल्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ एन या दोन कारमध्ये मसुडी रोडवरील मालसी परिसरात ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, स्कॉर्पिओमधील प्रवाशांनी फॉर्च्युनरचा फिल्मी स्टाईलने पाठलाग सुरू केला. पाठलाग दरम्यान फॉर्च्युनर थांबवण्यासाठी स्कॉर्पिओमधील व्यक्तींनी कारच्या टायरवर गोळ्या झाडल्या. मात्र, दुर्दैवाने यातील एक गोळी रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियर व्ही. के. जोशी यांना लागली.
गोळी लागल्याने जोशी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबाराच्या धास्तीने फॉर्च्युनरवरील ताबा सुटून ती जोहडी गावाजवळ एका झाडावर आदळली. त्यानंतर स्कॉर्पिओमधील हल्लेखोरांनी खाली उतरून फॉर्च्युनरमधील प्रवाशांनाही बेदम मारहाण केली, ज्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळाहून फरार झाले असून पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जोशी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.